अशीच एखाद्या दिवशी कुणाचीतरी नव्याने ओळख व्हावी आणि पटकन त्यांच्यातलं काही तरी मनाला इतकं भावून जावं, मोहवून जावं, की नकळतपणे एका नव्या, सुंदर नात्याची गुंफण सुरू व्हावी.. त्याच्या स्वभावातले बारकावे , कंगोरे उलगडत जावेत आणि हळूहळू ती नात्याची वीण घट्ट होत जावी...! मग सहजपणे आपण त्याला त्याच्या गुणदोषांसकट आपलेसे करतो.. ते नातं जीवंत होऊ लागतं ! अन्यथा त्या नात्यामध्ये फक्त कृत्रिमताच उरते.
याच प्रकारे, कलावंताला अभिव्यक्त होण्यासाठी एखादं नवीन माध्यम सापडतं आणि मग त्या माध्यमाचा स्वभाव... स्वभावविशेष इतका आवडून जातो, मोहवून टाकतो, की नकळतपणे ते माध्यम आणि त्या माध्यमाच्या शक्यता - मर्यादा, गुण-दोष.. असला काहीही विचार डोक्यात न घेता, तो कलावंत त्या माध्यमातून संपूर्णपणे, स्वच्छपणे अभिव्यक्त होण्यासाठी धडपड करू लागतो... त्याला त्या माध्यमाचा स्वभाव, कंगोरे, बारकावे ...सर्व काही हळूहळू उमजायला लागतं, आणि आपल्या साधनेने तो त्या माध्यमात एका अर्थाने 'प्राणप्रतिष्ठा' करतो आणि कदाचीत ते माध्यमही आपलं निर्जीवीत्व सोडून त्या कलावंताची संवेदनशीलता अनुभवू लागतं, आणि त्याला प्रतिसाद देऊ लागतं !
ते माध्यम त्या कलावंताची बोलीभाषा होऊ लागतं ! गेली कित्येक वर्षे, निसर्ग चित्र अतिशय उत्तम रंगवणाऱ्या गजाननचं निसर्ग चित्र, एका विशिष्ट टप्प्यावर येऊन पोहोचलं होतं ! आता त्या निसर्गचित्रा मधून, अचानक पणे उमटलेले, आकाराला आलेले, अनोळखी,अनवट, 'कशासारखे तरी' न दिसणारे आकार, त्याला वेगळाच सकस दृश्य अनुभव देऊ लागले होते, खुणवू लागले होते ! गजानन ही मोकळेपणाने त्या नित्यनवीन, मोहक आकारांना पुन्हा पुन्हा भेटू लागला होता ! नकळतपणे त्याचं निसर्ग चित्र बदलायला सुरुवात झाली होती. निसर्गचित्राचं ,"फक्त चित्र" होऊ लागलं होतं. हे "फक्त चित्र" आपली वाट शोधू लागलं होतं ! नवीन बदल मोकळेपणाने स्वीकारताना होणारी घालमेल ही अधेमधे गजाननाच्या कामात दिसत होती ! गजानन शोधाशोध करत होता !
आणि कुठेतरी, कशीतरी अचानकपणे त्याला ही रंगीत सेलोटेप-चिकटपट्टी भेटली ! आणि गजाननचा जीव त्या टेपमध्ये इतका गुंतला... गुंतत- गुंतत- गुंततच गेला, की त्यालाही त्याची कल्पना नसेल.. गजानन आणि सेलोटेप, एकमेकांना अगदी घट्ट बिलगूनच गेले !
गजाननला हे माध्यम आपलंसं वाटलं आणि त्याने चित्रनिर्मितीसाठी सेलोटेप वापरायला सुरुवात केली . त्या माध्यमाच्या शक्यता शोधायला...तपासायला सुरुवात केली. आणि त्याला या सेलोटेपच्या स्वभावातले गुण-विशेष, बारकावे, कंगोरे, सापडतच गेले ! सेलोटेपने ही त्याला, आपले अनंत रंगछटांचे अंतरंग उलगडून दाखवलं असावं. ही प्रक्रिया गजानन साठी खडतर, पण मोहवणारी, रम्य अनुभव देणारी असावी. पॅकेजिंग साठी, इलेक्ट्रिक फिटींग च्या कामासाठी टराटरा फाडली जाणारी ही दुर्लक्षित सेलोटेप गजाननच्या थेट अंतर्मनाला बिलगून गेली.
एखादं खोकं खूप गच्चपणे बंद करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या सेलोटेपने, गजानन साठी मात्र त्याच्या सृजन प्रक्रियेतलं एक अख्खं नवीन दालन उघडं करून दिलं ! त्याचं काम अखंडपणे सुरू झालं... तो वेगवेगळ्या आकाराच्या आणि रंगांच्या सेलोटेप साठी मुंबई पालथी घालू लागला...
"मी जगावेगळं असं काहीतरी माध्यम शोधून काढलंय", किंवा "इतर लोकांनी अजून ते वापरलं नाही, म्हणून मी ते वापरतोय" , किंवा "मला माझी सृजनप्रक्रिया आणि हे माध्यम...यांचं आपसातील नातं पूर्ण कळलंच आहे", असा कुठलाही अविर्भाव गजानन मध्ये आलेला नाही.
प्रत्येक कलावंताप्रमाणेच, प्रत्येक माध्यमाचाही स्वतःचा असा एक स्वभाव विशेष असतोच. स्वतःचे असे काही गुण दोष असतातच. शक्यता - मर्यादा, गुण - दोष, असं सगळं एकत्रित रसायन म्हणजेच ती व्यक्ती किंवा ते माध्यम असतं.
मला असं नेहमी वाटतं की कलावंत जसं माध्यमात काहीतरी शोधत, तपासत असतो, तसंच ते माध्यम ही त्या कलावंतात काहीतरी शोधत, तपासत असतं. ज्याप्रमाणे कलावंत त्या माध्यमाची परीक्षा घेत असतो, त्याच वेळी ते माध्यम ही त्या कलावंताची परीक्षाच घेत असतं . एकमेकांना चाचपडून बघायची, एकमेकांचे अंतरंग शोधायची प्रक्रिया दोन्हीकडून होत असते. कदाचित ते माध्यमही, त्या कलावंताची गुणवत्ता तपासून मगच, त्या कलावंताला आपल्यातलं काय द्यायचं आणि काय द्यायचं नाही, हे ठरवत असावं. कलावंत आणि त्याचं माध्यम, यांची नाळ एकदा जोडली गेली की मग ते दोघेही एकमेकांचे आतून पालनपोषण, मशागत करू लागतात. माध्यम कलावंताला आतून समृद्ध करतं आणि कलावंत माध्यमाला समृद्ध करतो. एकमेकांमुळे एकमेकांची वाढ होणं, हे उत्तम सहजीवनाचं द्योतक आहे.
गजाननला दृश्य भाषेतून जे सांगायचे आहे, त्यात सेलोटेप या माध्यमाच्या स्वभावविशेषामुळे (character and behaviour of Medium) कुठे तडजोड झाली आहे असं वाटत नाही. त्याने सेलोटेपच्या स्वाभाविक गुणवैशिष्ट्यांचा आपल्या चित्रात अप्रतिम वापर केला आहे. गजानन आणि त्याचे चित्र, या दोहोंमध्ये ही एकमेकांविषयी, आपसात अंतस्थ गोंधळ दिसत नाही. त्यामुळे त्याची ही चित्रे सहज सुंदर आहेत. त्याचं चित्र बघितलं, की आधी "तंत्र" न दिसता, "चित्र" दिसतं.
सुदैवाने, मी गेली कित्येक वर्ष.. १४ ते १५ वर्ष... त्याच्या या सेलोटेप चित्र कलासाधनेचा अखंड साक्षीदार आहे.
त्याच्या या सृजनप्रक्रियेतल्या, मधल्या एखाद्या टप्प्यावरची ही चित्रे तो प्रदर्शित करीत आहे, यानिमित्ताने त्याने आम्हाला दिलेल्या एका छान दृश्य अनुभवाबद्दल गजाननचं आणि सेलोटेपचं खूप अभिनंदन आणि खूप शुभेच्छा !