चिंतनाला प्रयोगशीलतेची व सर्जनशीलतेची सांगड घालून सतत वैविध्यपूर्ण रचनाबंध शोधणारा मिरजेचा गजानन कबाडे हा आधुनिक समकालीन चित्रकलेतील आघाडीचा चित्रकार आहे. सांगलीच्या कलाविश्व महाविद्यालयातून १९९१ साली डिम्लोमा पेंटिंगच्या वर्गात प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्यासह राज्यात दुसरा आला आहे. १९९२ मध्ये मुंबईच्या सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन उत्तीर्ण झाला आहे. वसईच्या रॉबी डिसिल्वा स्कूल ऑफ आर्टमध्ये एक वर्ष कलाध्यापनाचे काम केल्यानंतर १९९३ ते १९९९ या काळात मुंबईतील सेंट ल्युईस कॉन्व्हेन्ट हायस्कूल आणि केंब्रिज स्कूलमध्ये कलाशिक्षक असताना त्याने मुलांच्या आत्माविष्काराला संधी देणारे अनेक प्रयोग राबविले. मुंबईतील टाटा इंटर अॅक्टिव्ह सिस्टीममध्ये ग्राफीक डिझायनर म्हणून सुमारे दहा वर्षे काम केले आहे. वास्तववादी चित्रणाचा पाया मजबूत असल्याने त्याने सुरवातीच्या काळात निसर्गचित्रणाचा आणि व्यक्तीचित्रणाच अनेक वर्षे शास्त्रशुद्ध अभ्यास केला. या अभ्यासातूनच पुढे त्याच्या चित्रणात कमालीचे सुलभीकरण आणि माध्यमाचा वैविध्यतेचे दर्शन घडत गेले. त्याच्या कलाकृतींना अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील पारितोषिके मिळाली आहेत. त्याची पंधराहून अधिक भारत आणि भारताबाहेर समूह चित्रप्रदर्शने झाली असून मुंबईतील आर्टीस्ट सेंटर, नेहरू सेंटर, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, आर्ट गेट गॅलरी, आर्ट सोल आणि युकेतील इडनबर्ग या ठिकाणी झालेल्या समूह प्रदर्शनात त्याच्या सेलो टेपमधील चित्रांनी कलामीक्षकांची व कलाभ्यासकांची पसंती मिळवली आहे. चित्रनिर्मितीबरोबरच त्याच कलाध्यापनाचा पिंड असल्याने त्याने राज्यातील अनेक कलासंस्थामध्ये चित्रकार्यशाळा घेतल्या आहेत भारत आणि भारताबाहेर त्याच्या कलाकृती अनेक ठिकाणी संग्रहीत असून सध्या तो पूर्णवेळ चित्रनिर्मितीत कार्यरत आहे.
साधारणपणे आपल्याकडे चित्र काढायला येणं म्हणजे मानवाकृती काढता येणं असं अपेक्षित असतं. ज्याला मनुष्याकृती म्हणजेच पोर्टेट येत नाही त्याला चित्र येत नाही असंच गृहीत धरलं जातं. माणसाच्या किंवा निसर्गाच्या हुबेहूब चित्रालाच आपल्याकडे चित्र म्हटलं जातं. समोरच्या दृश्याचं निसर्गचित्र किंवा मॉडेलवरून रेखाटलेलं एखाद्या व्यक्तीचं व्यक्तीचित्र हे प्रत्येक चित्रकाराला जमायलाच हवं. इतका सनातनी कर्मटपणा अन्य कोणत्याच कलेत पहावयास मिळत नाही. माणसाचं किंवा निसर्गाचं प्रतिरूप रेखाटलं तरच ते चित्र असं वर्षानुवर्षे आपल्यावर कोणी बिंबवलं? आजपर्यंत ‘चित्र’ या संकल्पनेचे जे संस्कार आपल्यावर झाले आहेत, त्यातून सहज बाहेर पडता येईल असं वाटत नाही परंतु या परंपरेला छेद देत अनेक प्रतिभाशाली कलावंतानी आपल्या बुद्धी कौशल्याच्या व सर्जनतेच्या जोरावर चित्रशिल्पकलेत नवनव्या वाटा निर्माण केल्या आहेत.
आपल्या प्रत्येकासाठी हे जग दोन प्रकारचे असते. एक ओळखीचे, परिचयाचे तर दुसरे अनोळखी, गूढ असते. कलावंत सभोवतालच्या जगाचा कधी ओळखीच्या आकारात चित्रनिर्मिती करीत असतो. तर कधी अनोळखी, अमूर्त आकारात या अनाकलनीय विश्वाचा शोध घेत असतो. ओळखीचे आकार परिचित असल्यामुळे रसिकांशी संवाद साधणे सोपे असते. दृश्य जगातील अनेक वस्तू घटकांना कलावंत चित्ररूप देऊन त्याचे एक प्रकारे मानवीकरण करीत असतो. वस्तू जशी आहे तशी ती न रेखाटता ती जशी भावली तशी तो रेखाटत असतो. हे करीत असताना त्या वस्तूघटकाचे मूळरूप तसेच राहील असे नाही. मात्र त्या वस्तूघटकाचा कलावस्तू म्हणून झालेला वापर अधिक भावणारा असतो. अमूर्त आकृतिबंधात देखील हेच सूत्र असते. इथेही अमूर्त आकारांचे मानवीकरण केले जाते. कलावंत आपल्या भावभावना, विचार, कल्पना, अनुभव व ज्ञान या अमूर्त आकारातून मांडत असतो. ही अमूर्तता येते कोठून? आपल्या दैनंदिन जगण्यात बऱ्याच गोष्टींचा उलगडा होत नाही. बऱ्याच गोष्टी गूढ, अनाकलनीय, असंबद्ध आणि धुसर वाटू लागतात. माणसाच्या जगण्यालाच एक प्रकारची अमूर्तता आली आहे. जगणे अर्थहीन, संदर्भहीन आणि अनेक व्यामिश्र कल्पनांनी गोंधळून गेले आहे. या व्यामिश्रतेमध्ये संगती नसल्याने त्यामध्ये अर्थ शोधायचा नसतो. जगण्यातील व चित्रातील ही अमूर्तता फक्त अनुभवायची असते. तिचा आनंद घ्यायचा असतो. या अमूर्ततेला प्रश्न करण्यापेक्षा त्याचा सुखद आनंद घ्यावा.
‘रंगविलेल्या आकारातून साधलेली कलाकृती म्हणजे चित्र’ अशी एक चित्राची व्याख्या केली जाते. चित्र काढण्यासाठी कागद, कॅनव्हास, भिंत, रंगद्रव्ये, कुंचला, यासारख्या माध्यमसाधनांची आवश्यकता असते. या साधनांशिवाय किंवा यासारख्या तत्सम साधनांचा वापर करूनही चित्र काढता येऊ शकते का? माध्यम हे अभिव्यक्तीचं साधन आहे. त्यामुळे माध्यमाला किती महत्त्व द्यायचं? कोणताही श्रेष्ठ कलावंत माध्यमात अडकत नाही. चित्रासाठी रंग रेषा, आकार, छायाभेद, पोत या मूलतत्त्वाची जाण असावी लागते, हे मान्य! परंतु रंग म्हणजे द्रव्य किंवा भुकटीच्या रूपातच आणि रेषा म्हणजे पेन्सिल किंवा तत्सम साधनांनेच मारायला हवी असे नाही. मूलतत्त्वाचा परिणाम महत्त्वाचा तो कशापासून साधला आहे, असे महत्त्वाचं नाही. आधुनिक चित्रकलेत अभिव्यक्ती प्रकार (शैली) जसे वैविध्यपूर्ण होत आहेत तसेच चित्रकलेतील माध्यम साधने ही आशयानुसार बदलत आहेत.
प्रस्तूत कलाकृती ही अमूर्त शैलीतील म्हणजे अनोळखी आकारातून साधलेली अभिजात कलाकृती आहे. रूढार्थाने हे चित्र रंगद्रव्ये व कुंचला वापरून केलेले नाही. विविधरंगी प्लास्टिक कलर टिस्को (गमटेप) वापरून केलेली ही कलाकृती समकालीन आधुनिक चित्रकलेचे प्रतिनिधीत्व करते. संपूर्ण टिस्को टेप वापरून केलेली ही सोबतची कलाकृती तिच्या कलात्मक व माध्यमिक विषयक वैशिष्ट्यामुळे वेगळी ठरते. अशा माध्यमात कलाकृती होऊ शकते, ही कल्पनाच भन्नाट आहे. माझ्या माहितीप्रमाणे संपूर्ण टिस्कोमध्ये कलाकृती साकारणारा आणि त्याला भारत आणि भारताबाहेर मान्यता मिळवून देणारा गजानन कबाडे हा एकमेव चित्रकार असावा.
टिस्को टेपला सेलो टेपही म्हणतात. या कलाकृतीसाठी निळ्या, पांढऱ्या व करड्या रंगाचे सेलो टेप वापरले आहेत. सनबोर्डवरती हे कलर सेलो टेप रचनाकृतीचा विचार करून चिकटवले आहेत. विविधरंगी सेलो टेपचा इतका सफाईदार वापर करून अपेक्षित परिणाम साधणं यासाठी त्या माध्यमाशी किती एकरूप व्हावं लागलं असेल याची कल्पना केलेली बरी. निळसर करड्या छटेतील या चित्रात निळ्या रंगाच्या अनेक छटा मिळवल्या आहेत. पारदर्शी व अपारदर्शी रंगछटा या कलर सेलो टेपमधून मिळवत असताना अनेक क्लृप्त्या वापरल्या आहेत. काही परिणाम साधण्यासाठी सेलो टेप चिकटवल्यानंतर विशिष्ट ताकद लावून ओढले आहेत. वेगवेगळे आकार तयार करण्यासाठी सेलो टेपचे कटिंग पेस्टिंग अचूक आणि रचनाबंधाशी अनुरूप केले आहे. सेलो टेप चिकटवताना नंबर प्लेटसाठी वापरले जाणारे व्हिनाईल कटिंगचे टूल वापरले असून वेगवेगळ्या परिणामासाठी आवश्यक त्या तंत्राचा वापर केला आहे. सेलो टेपचे रंग ताजे आणि तेजस्वी असतात. टेपच्या वरच्या बाजूला असलेली चकाकी चित्राच्या रंगसंगतीला आणि पृष्ठभागाला बाधा आणत नाही. तेजस्वी रंगामुळे चित्र अधिक लक्ष वेधून घेते.
चित्राचे माध्यम त्या चित्राचा दर्जा ठरवत नसते. या चित्राचे माध्यम रंगीत सेलो टेप आहे हे सांगितल्याशिवाय लक्षात येत नाही. यावरून लक्षात येईल की, हा रंगीत सेलो टेप चित्रकाराने किती उंचीवर नेऊन ठेवला आहे. अगोदर म्हटल्याप्रमाणे या चित्रात काही शोधण्यापेक्षा अशा अमूर्ततेचा आनंद घ्यावा. शास्त्रीय संगीतातील एखादा आलाप जसा आपल्याला मंत्रमुग्ध करतो, तसाच या चित्रातील रंगाकारानी भारलेला अवकाश नेत्रसुखद अनुभूती देवून जातो.